राज्य मंत्रिमंडळ निर्णय; महत्वाचे निर्णय
1 min read
मुंबई दि.३०:- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे ब्रॅाडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाकरिता ३ हजार २९५.७४ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाच्या ५० टक्के हिस्सा म्हणजेच १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा अधिकचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली.
यामुळे साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेले तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहे. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली.
यानुसार राजशिष्टाचार विभागात परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क अशी तीन नवीन कार्यासने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. यामुळे गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि परदेशातील मराठी नागरिकांशी संपर्क वाढविणे शक्य होणार आहे.
राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे.
याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्यामुळे शिरपूर येथे नवीन न्यायालय स्थापना समितीने मंजुरी दिली आहे.
यानुसार दोन न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मौजे करडा येथील सुविदे फाउंडेशनला देण्यात आलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणास मान्यता देण्यात आली. सुविदे फाउंडेशन कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था असून ती ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्यात येते.
