कापसाचा दर निश्चित; ‘कपास किसान’ ॲपद्वारे नोंदणी सुरू
1 min read
दिल्ली दि.३०:- सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू होत असून कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ ॲपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.
एमएसपीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ,” असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.”केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यकृत बाबींनुसार गेल्या दहा वर्षांत किमान आधारभूत किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राने ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीनची विक्रमी खरेदी केली होती. यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनच्या एमएसपी मध्ये ₹४३६ प्रती क्विंटल वाढ करुन ₹ ५,३२८ केली आहे.
तसेच उडीद एमएसपी ₹ ७,८०० आणि मूगसाठी ८७६८ रुपये केली आहे”. या वर्षी मूग खरेदीचे ३.३० लाख क्विंटल, उडीद खरेदीचे ३२.५६ लाख क्विंटल आणि सोयाबीन खरेदीचे १८.५० लाख मेट्रिक टन असे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट आहे.
शेतकरी विक्रीस आणेल त्या सर्व सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या मोठ्या प्रमाणात खरेदीचे नियोजन राज्य शासनाने केले असल्याचे पणनमंत्री रावल यांनी सांगितले.राज्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसासाठी देखील एमएसपी खरेदी सुरू आहे.
‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू असून, आतापर्यंत ३.७५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षीचा कापूस दर ₹७५२१ होता, यावर्षी केंद्र शासनाने यात मोठी वाढ करून ₹८११० प्रती क्विंटल दर निश्चित केला आहे.
म्हणजेच ₹५८९ रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी सहा लाख सत्तावीस हजार शेतकरी बांधवांकडून १०,७१४ कोटी रुपयांच्या १४४ लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली होती. यामुळे यावर्षी खरेदी केंद्रांची संख्या १२४ वरून १७० पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री रावल यांनी दिली.
