महसूल अधिकाऱ्यांच्या घरात सापडले सहा कोटींचे घबाड; हा अधिकारी शेतकऱ्यांकडून घ्यायचा लाच

1 min read

पुणे, दि.१०:- महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय एसीबी) पथकाने शुक्रवारी पकडले. डॉ. रामोड यांच्या बाणेर येथील बंगल्यातून कागदपत्रे तसेच सहा कोटींची रोकड जप्त केली आहे. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे.सीबीआयच्या पथकाने लष्कर भागातील शासकीय वसाहतीत शुक्रवारी दुपारी ही कारवाई सुरू केली आहे. कारवाई केली. रामोड यांच्या शासकीय वसाहतीतील निवासस्थानातून सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली. विभागीय आयुक्त कार्यालयात (कौन्सिल हॉल) अनिल रामोड यांचे कार्यालय आहे, त्यांच्या दालनातून सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली असून सीबीआयच्या पथकाने रामोड यांना ताब्यात घेतले आहे.

रामोड यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर सीबीआयचे पथक त्यांना पुण्यातील कार्यालयात घेऊन रवाना झाले, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने रामोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

बाणेर येथील ऋतूपर्ण सोसायटीत त्यांचा बंगला आहे. बंगल्यातून १४ स्थावर मालमत्तेची कागदपत्रे तसेच सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सीबीआयच्या पथकाने रक्कम मोजणीसाठी यंत्र मागविले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यावर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. रामोड मूळचे नांदेड येथील असून गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून काम पाहत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे