२० ते २२ लग्नाळू तरुणांशी लग्न करून फसवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड; लग्नानंतर दागिने व पैसे घेऊन विवाहित तरुणी व्ह्यायची पसार; ६ जणांना अटक

1 min read

नारायणगाव दि.७ – ग्रामीण भागातील तरुणांशी विवाह करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी नारायणगाव पोलिसांनी नाशिक मधून गजाआड केली असल्याची माहिती जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

खोट्या पद्धतीने लग्न लावून फसवणूक करणारे जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव ता. त्र्यंबकेश्वर नाशिक), मीरा बन्सी विसलकर (वय ३९), तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, रा. अंबुजावाडी इगतपुरी घोटी), बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा. बोटा, ता. संगमनेर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४, रा. कुरकुटवाडी, बोटा), बाळू गुलाब सरखडे ( वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दोन महिन्यापूर्वी गुंजाळवाडी व खोडद (ता- जुन्नर) येथील तरुणांशी मध्यस्थींच्या मार्फत एकाच मुलीने काही महिन्यांच्या अंतरावर लग्न केले होते. लग्नानंतर मुलगी चार ते पाच दिवस नवरदेवाच्या घरी राहून लग्नात बनवलेले सोन्याचे दागिने व आई वडील आजारी असल्याचे खोटे सांगून लाखो रुपये घेऊन जात असे. त्यानंतर फोन बंद करून पुन्हा येत नसे. दोघाही तरुणांची प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपयांचे फसवणूक झाली असल्याचा नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने त्याचाच गैरफायदा घेऊन विवाहासाठी आडलेल्या इच्छुक नवरदेवाबरोबर मुलीचे लग्न लावून द्यायचे आणि लग्नाच्या चार ते पाच दिवसानंतर विवाहित मुलाकडून लग्नात बनविलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळून जायचे अशा प्रकारची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत असून आजपर्यंत या टोळीने वीस ते बावीस तरुणांबरोबर अशा पद्धतीने लग्न लावून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लग्न जमवताना नातेगोते, पाहुणे मित्र व घरदार पाहूनच खात्री झाल्यानंतर लग्न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांच्याकडे सोपविला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे