जामखेडमध्ये 14 लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखू हस्तगत; तिघांना अटक; एक पसार

1 min read

जामखेड दि .३१:- राज्यात बंदी असलेला 14 लाख 34 हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड (जिल्हा -अहमदनगर) येथून हस्तगत केला.या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले.

जामखेड तालुक्यातील लोहारदेवी मंदिराजवळील पटांगणात टॅम्पो व चारचाकी वाहन लावून राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून तीन आरोपींना जेरबंद केले, तर एक आरोपी पसार झाला.

राजू विठ्ठल शिंदे (वय 30, रा. चौसळा, जि. बीड), मोहित सुभाष मिसाळ (वय 19, रा. आनंदवाडी, ता. जामखेड) व योगेश सुखदेव खाडे (वय 19, रा. आनंदवाडी, ता. जामखेड) असे जेरबंद आरोपींची नावे आहेत. तर विनोद छबू तोंडे (रा. बीड रस्ता, जामखेड) असे पसार आरोपीचे नाव आहे.

आरोपींकडून 16 गोण्यांतील गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू हस्तगत करण्यात आली. पथकाने पुढील कारवाईसाठी आरोपींना जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे