खामुंडी येथे जेष्ठांच्या सामूहिक वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण
1 min read
पिंपरी पेंढार दि. ३:- -हल्ली दुचाकीच्या सीटवर केक ठेऊन भररस्त्यात केक कापून एकमेकांच्या तोंडाला फासण्याची टूम निघाली आहे मात्र खामुंडीच्या जेष्ठ नागरिकांनी सामूहिकरीत्या एकत्र वाढदिवस साजरा करीत भविष्यात सर्वाना उपयुक्त ठरतील अशा विविध झाडांचे वृक्षारोपण करून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करीत आदर्श निर्माण केला आहे.
१ जून हा शासकीय वाढदिवस म्हणून सर्वत्र साजरा होत असतो,खामुंडी (ता.जुन्नर) या छोट्याशा गावातील २२ जेष्ठांनी यंदाचा वाढदिवस सर्वांनी एकत्र येऊन करण्याचे ठरविले त्यानिमित्त सकाळी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात पूजापाठ, महाआरती करून नाथांच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात केली.
गावातील २२ जेष्ठ नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावच्या परिसरात सामूहिक पद्धतीने स्वतः परिश्रम करून विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले व त्याचे संगोपनाची जबाबदारी स्वीकारली जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोविंद बोडके यांनी यावेळी वृक्षारोपणाचे महत्व यावेळी विशद केले.आंबा, वड, सिसम,निलगिरी, बकुळ,बेल आदी १३ प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच वनराज शिंगोटे,ग्रा.पं सदस्य सागर कोकाटे,दीपाली सासवडे, सत्यवान डुंबरे,कल्पना कोकाटे,सुरेखा भोर,डॉ. पुरुषोत्तम बोऱ्हाडे श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रष्टचे कार्याध्यक्ष संदीप गंभीर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन उपेंद्र डुंबरे यांनी केले तर आभार बनू बोडके यांनी मानले.