विधानभवनात जोरदार राडा; आव्हाड-पडळकर समर्थक एकमेकांना भिडले

1 min read

मुंबई दि.१८:- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंड पडळकर यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही. काल विधानभवनात आव्हाड आणि पडळकर समर्थक एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विधानभवनाच्या आवारात हा सारा प्रकार घडला आहे.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ होते. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली, धक्काबुक्की झाली. प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच विधानभवन परिसरात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास पाच ते दहा मिनिटं हा वाद सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळही केली, असे समजते.विधिमंडळाचं अधिवेशन उद्या संपणार आहे, त्यापूर्वी आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी त्यांना काल झालेला वाद,त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली. यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. जितेंद्र आव्हाड या घटनेनंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले घडलेली घटना अतिशय चुकीची आहे, अशा प्रकारे घटना घडणं बिल्कूल योग्य नाही, या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा, सभापती विधानपरिषद यांच्या अंतर्गत हा परिसर येतो. अध्यक्ष सभापतींनी त्यांनी याची गंभीर दखल घ्यावी. यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी, अशी विनंती केलेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!