दारू पिऊन सासुरवाडीत बायकोला मारहाण करून धिंगाणा घालणाऱ्या जावायाला पोलिसांनी केली अटक
1 min read
साकोरी दि.१७:- सासरवाडीला आलेल्या जवायला मोठा मानपान असतो परंतु साकोरी येथे जावयाने विचित्र प्रकार केला असून जावयाने दारूच्या नशेत मुलीसह शिक्षक असलेल्या बायकोला मारहाण करीत घरासमोरील दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साकोरी (ता.जुन्नर) येथे घडली.
या घटनेत दुचाकी जळून खाक झाली असून पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पती अजय लक्ष्मण गगे (रा. नळावणे, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जावायाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नळावणे येथील प्रतिभा अजय गगे या त्यांच्या माहेरी साकोरी येथे मुलींसह गेल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचे पती अजय लक्ष्मण गगे हे दारूच्या नशेत साकोरी (तालुका जुन्नर) येथे आले.
हातात पेट्रोलच्या दोन बाटल्या घेऊन मला आणि माझ्या मुलीला पेटवून जाळून टाकतो, असे म्हणत मला मारहाण केली. मला शिवीगाळ करत घरासमोर उभी असलेली टीव्हीएस कंपनीचे पेप मॉडेलची दुचाकी (एमएच १४ ईडी ३२०६) पेट्रोल ओतून जाळून टाकल्याची फिर्याद प्रतिभा अजय गगे यांनी दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून त्यांचे पती अजय लक्ष्मण गगे (रा.नळवणे, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध विविध कलमानुसार आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक फापाळे करीत आहेत.