पाकने गुडघे टेकल्यावरच थांबवले ‘ऑपरेशन सिंदूर’:- परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

1 min read

नवी दिल्ली दि.२७:- दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर जवळपास ३० मिनिटांनी याची माहिती पाकला देण्यात आली होती, असे स्पष्ट करत केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप सोमवारी फेटाळून लावले. तसेच पाकच्या विनवणीनंतरच भारताकडून सैन्य कारवाई थांबविण्यात आली. द्विपक्षीय स्तरावरच शस्त्रसंधी निर्णय घेण्यात आला होता. यात अमेरिकेचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता, असे जयशंकर यांनी एका संसदीय समितीसमोर स्पष्ट केले.परराष्ट्रविषयक सल्लागार समितीच्या सदस्यांसमोर एस. जयशंकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबतची सविस्तर माहिती मांडली. पाकिस्तानच्या लष्करी मोहिमेच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) विनंती केल्यानंतरच भारताकडून
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबविण्यात आले होते. दोन्ही देशांदरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे जयशंकर यांनी समितीला सांगितले. तसेच दहशतवाद्यांविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर जवळपास ३० मिनिटांनी याबाबत पाकला कळविण्यात आले, असे स्पष्ट करत जयशंकर यांनी यासंबंधीचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले. मोदी सरकारने या अभियानाबाबत अगोदरच पाकला कळवले होते, असा आरोप राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. परंतु, काँग्रेसकडून अतिशय चुकीच्या पद्धतीने तथ्यांची मांडणी केली जात असल्याचा दावा जयशंकर यांनी केला. तसेच संघर्षांदरम्यान फक्त दोन्ही देशांच्या डीजीएमओनेच एकमेकांशी संवाद साधला. अन्य कुठल्याही भारतीय अधिकाऱ्याने पाकसोबत चर्चा केली नाही. पाकसोबत चर्चेचा आग्रह करणाऱ्या अमेरिकेलादेखील दहशतवाद आणि चर्चा एकत्र होत नसल्याचे ठणकावून सांगण्यात आले होते, असे परराष्ट्र मंत्र्यांनी समितीसमोर स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीचे छायाचित्र जयशंकर यांनी सोशल माध्यम ‘एक्स’वर शेअर केले. बैठकीच्या सुरुवातीला परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी खासदारांसमोर ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सादरीकरण केले. यानंतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना जयशंकर यांनी पाकसोबतच्या संघर्षावेळी भारताने परिस्थितीनुसार घेतलेल्या ठोस भूमिकेची माहिती दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे