तिहेरी खून प्रकरणात फौजदारास जन्मठेप

1 min read

पुणे दि.२८:- तिहेरी खूनप्रकरणात एका उपनिरीक्षकास अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी जन्मठेप आणि तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संजय बळीराम शिंदे (रा. गोपाळवाडी रोड, सरपंचवस्ती, ता. दौंड) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोघांना तर किरकोळ भांडणावरून एकास अशा तिघांना गोळ्या घातल्या.ही घटना १६ जानेवारी २०१८ रोजी दौंड येथे घडली. गोपाळ काळुराम शिंदे (रा. भवानीनगर, ता. दौंड), परशुराम गुरूनाथ पवार (रा. दौंड) अनिल विलास जाधव (रा. लिंगाळी, ता. दौंड) यांच्या खून प्रकरणी गजानन काळुराम शिंदे (रा. देवकीनगर, दौंड) यांनी फिर्याद दिली होती. गोपाळ हे गजानन यांचे भाऊ असून परशुराम हे मेहुणे आहेत. घटनेदिवशी उसने घेतलेल्या पैशावरून गोपाळ शिंदे व संजय शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यावेळी फिर्यादी मेहुण्यासह घटनास्थळी आले. यावेळी गजानन यांनी मध्यस्थी करीत मी पैसे देतो, असे सांगून गोपाळ, परशुरामला घरी जाण्यास सांगितले. यावेळी रस्ता ओलांडून जाताना गोळीचा आवाज आल्याने गजानन यांनी मागे पाहिले असता संजय याने गोपाळवर गोळी झाडल्याचे दिसले. परशुराम यांच्यावरही गोळी झाडून संजयने रिव्हॉल्वहर गाडीच्या डिक्कीत टाकले. निघून गेला. संजय फिर्यादीच्या ओळखीचे अनिल जाधव याच्या घरी गेला. तेथे गोळी झाडत त्याचा खून केला.संजय शिंदे हा नगरच्या दिशेने जाताना त्याला अटक केली. त्याच्याकडे पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे, दोन मॅगझीन आढळली. दोन्ही घटनास्थळी दहा पुंगळ्या मिळाल्या. सध्या अमेरिकेत असलेल्या बॅलेस्टीक एक्सपर्टची साक्ष व्हीसीद्वारे नोंदविली. शस्त्र, दारूगोळा सुरक्षेसाठी असताना संजय शिंदे याने शस्त्रागारातून पिस्तूल व मॅगझीन लंपास केले होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी ३२ साक्षीदार तपासले. चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, बॅलेस्टीक एक्सपर्ट, डॉक्टरांचा अहवाल महत्त्वाचा ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे