प्रीतम काळे यांना उपसभापती करा ; आळे ग्रामस्थांची मागणी
1 min read
जुन्नर दि.१३:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी संजय काळे यांची निवड निश्चित असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी काल दिली असून उपसभापती पदावर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून निवड केली जाणार असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली.तर प्रीतम काळे यांना उपसभापती पद द्या अशी मागणी आळे ग्रामस्थांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य यांनी शिवनेरी विकास पॅनलला बहुमताने निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी असती तर मला जास्त आनंद झाला असता असे बेनके यांनी सांगितले. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संजय काळे यांच्या नेतृत्वाखाली लढविली असल्याने सभापती पदावर त्यांची निवड निश्चित आहे.
उपसभापती पदासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी पक्षाची संघटना आणि काँग्रेस पक्ष एकत्रित बसून निर्णय घेवू. अनेकांची उपसभापती पदावर बसण्याची इच्छा असल्याने कशाप्रकारे न्याय देता येईल, हे सर्वांना विश्वासात घेऊन ठरविले जाणार असल्याचे बेनके यांनी म्हटले.
“आळे गावचे सरपंच प्रीतम काळे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण केली असून जशी जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सभापती पदासाठी संजय काळे यांना संधी मिळणार आहे. तशी पूर्वपट्ट्यात प्रीतम काळे यांना संधी मिळावी.
– माऊली कु-हाडे, मा. सदस्य जिल्हा परिषद पुणे.