मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज अकोल्यात ; निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी;अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर तालुक्यांना होणार फायदा

1 min read

अकोले दि.३१:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ३१ मे रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे.

निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे.

डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. निळवंडे धरणांचा पाणीसाठा २३६ दक्षलक्ष घनमीटर, ८.३२ टीएमसी ऐवढा आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा २२१.५० दक्षलक्ष घनमीटर ऐवढा आहे. धरणाची लांबी ५३३ मीटर आहे. सांडव्याची लांबी ७२ मीटर आहे. ५ सांडव्याद्वारे ३७०० क्यूमेक (घनमीटर प्रतिसेंकद) पाण्याचा विसर्ग होणार आहे.

या धरण प्रकल्पासाठी एप्रिल २०२३ अखेर २३५१ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. १४ जूलै १९७० रोजी प्रकल्पास ८ कोटी रूपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. २५ मार्च १९७७ रोजी १६ कोटी रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली.

त्यानंतर २२ जून १९९३ रोजी २३४ कोटी रूपयांची दुसरी सु.प्र.मा मिळाली. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ७६० कोटी रूपयांची तृतीय सु.प्र.मा.मिळाली. २१ जून २०१७ रोजी २३७० कोटी रूपयांची चतुर्थ सु.प्र.मा मिळाली आहे. तर ८ मार्च २०२३ रोजी ५१७७ कोटी रूपयांची पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पास मिळाली आहे.

निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा ८५ किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मधील १३, संगमनेर ४३, राहाता ३७, श्रीरामपूर ३, कोपरगाव ११ व सिन्नर (नाशिक जिल्हा) ६ असे एकूण ११३ गावांमधील ४३८६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

उजवा कालवा हा ९७ किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मधील ११, संगमनेर ३७ व राहूरी २१ असे एकूण ६९ गावांमधील २०३९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय पाईप कालव्याद्वारे २३२८ हेक्टर क्षेत्र व जलाशयावरील उपसा सिंचन योजना २२९० हेक्टर असून असे एकूण ६८८७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

भूसंपादन सद्यस्थिती : – धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी लागणारे १३१७.३५ हेक्टर क्षेत्र (१०० टक्के) ताब्यात आहे. तसेच कालव्यासाठी एकूण संपादन करावयाचे क्षेत्र १४२७.३६ हेक्टर आहे, ताब्यातील क्षेत्र १४२४.०९ हेक्टर आहे व संपादन करावयाचे उर्वरित क्षेत्र ३.२७ हेक्टर आहे. कालव्यासाठी ३.२७ हेक्टर क्षेत्र संपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. ऑगस्ट २०२३ अखेर सर्व भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशी माहिती या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे.

पुनर्वसन सद्यस्थिती : – ऊर्ध्व प्रवरा (निळवंडे 2) प्रकल्पामुळे एक गाव व एक वाडी पूर्णतः व 12 गावे अंशतः बाधित होत आहेत. बाधित झालेल्या गावांमधील लोकांचे पुनर्वसन पूर्ण झालेले आहे. असा हा बहुउद्देशीय निळवंडे धरण प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यांतील दुष्काळी व जिरायती भागांसाठी जीवनदायी ठरणार आहे. यात यत्किंचित शंका नाही.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे