पेमदरा गावच्या सरपंचपदी जयश्री गाडेकर विजयी

1 min read

आणे दि.११:- पेमदरा (ता.जुन्नर) ग्रामपंचायत सरपंचपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत जयश्री पाटीलबा गाडेकर या विजयी झाल्या.सरपंच पदासाठी जयश्री पाटीलबा गाडेकर, सुमन रंगनाथ बेलकर, सुवर्णा दत्तू आहेर या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यातील सुवर्णा आहेर यांनी माघार घेतली.

एकूण ९ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बुधवारी (दि. १०) निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही सरपंचपदाची निवडणूक झाली.
जयश्री गायकवाड, सुमन बेलकर यांच्यात अटीतटीची लढत झाली.

सर्वच्या सर्व ९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यामध्ये जयश्री गाडेकर यांना ५ मते मिळाली. त्यामुळे त्या विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी घोषित केले. सहायक म्हणून ग्रामसेवक गुलाब जगताप यांनी काम पाहिले.तसेच पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे