संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

1 min read

मुंबई दि.७:- भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला असून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असं नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या त्यासंदर्भात बैठकाही झाल्याचं राणे यावेळी म्हणाले.

येणाऱ्या आठवड्यात राज्यात भूंकप होणार आहे. 10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असं राणे म्हणाले. पुढे बोलतांना राणे म्हणाले की, मला माझ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यांची तशी बोलणीही सुरु आहेत.

तसचं, मागच्या काही दिवसांपासून पाहिलं तर राऊत हे नेहमीच अजित पवारांवर टीका करत आले आहेत. कारण राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांनी अट ठेवली आहे, ती अट अशी की अजित पवार ज्यावेळी पक्ष सोडतील तेव्हाच मी राष्ट्रवादीत प्रवेश करेन. आता उद्धव ठाकरेंचं काही खरं नाही. त्यांचा स्वत:चा पक्ष राहिलेला नाही. मला उद्धव ठाकरे पुन्हा खासदार बनवू शकत नाहीत. म्हणून मला आता उद्धव ठाकरेंसोबत राहायचं नाही, असं राऊत यांनी राष्ट्रवादीत सांगितल्याचं राणे म्हणाले.

संजय राऊत हा साप आहे. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत बसले आहेत. पण राऊत हा नाही बाळासाहेबांचा झाला ना तुमचा,उद्धव ठाकरेंचा होणार. राऊत यांनी बाळासाहेब असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भांडणं लावली आणि तेच आता उद्धव ठाकरेंच्या घरात करत आहे. जेव्हा राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा राऊतांचे खरे मनसुबे ठाकरेंना कळतील, असं म्हणत राणे यांनी ठाकरेंना सावध राहण्यास सांगितलं आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे