मोठी बातमी ! शरद पवारांनी घेतला निर्णय मागे; शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
1 min readमुंबई दि.५:- ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी त्यांची भुमिका होती.
या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व स्तरातून विरोध केला जात होता. त्यामुळे पवार यांनी आज हा निर्णय मागे घेतला असून पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असतील हे जाहीर करण्यात आले.
शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. पवार यांनी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता पवारांचे हितचिंतक, प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यानी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून पवार यांना आवाहन केले.
त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी पवारांना अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की ‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे.
माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे.
माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.
आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो.