संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी महत्वाची चर्चा
1 min read
नवीदिल्ली दि.२:- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव वाढला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी त्यांचे अमेरिकन समकक्ष मंत्री पीट हेगसेथ यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आहे.यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनीही हॉटलाइनवर चर्चा केली होती. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकारण शस्त्रसंधी उल्लंघनाबाबतीत भारताने पाकिस्तानला इशारा दिला होता. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही त्यांचे अमेरिकन समकक्ष मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा केली.
रुबियो यांनी दहशतवादविरोधी सहकार्यासाठी भारतासाठी अमेरिकेची वचनबद्धता राहणार असल्याचे म्हटले आहे. २२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये २६ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले होते. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावलं उचलली आहेत. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी एकात्मिक तपासणी नाका बंद करणे.
आणि उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यांचा समावेश आहे. २९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान, सर्व सेवा प्रमुख आणि एनएसए अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली.
यापूर्वी, २३ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (सीसीएस) बैठक पार पडली होती. आता भारत दहशतवादाविरोधात कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.