मतदार यादीबद्दल आयोगाचं मोठं पाऊल; केले तीन मोठे बदल

1 min read

नवीदिल्ली दि.२:- भारत निवडणूक आयोगानं मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तीन नवे उपक्रम सुरू केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात सुलभीकरणाची प्रक्रिया पार पडली.महत्त्वाचा निर्णय म्हणजे, आता मृत्यू नोंदणीची माहिती थेट इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून निवडणूक आयोगाला मिळणार आहे. त्यामुळे मृत व्यक्तींची नावे वेळीच मतदार यादीतून हटवणे शक्य होणार आहे. बूथ लेव्हल ऑफिसर्स, म्हणजेच BLO यांना आता एकसंध फोटो ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची खात्री होईल आणि घरपोच पडताळणीसाठी BLO अधिक विश्वासार्ह ठरतील. मतदार माहिती पर्चीचा नव्या डिजाईनमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मतदाराचा क्रमांक आणि भाग क्रमांक आता अधिक ठळकपणे छापले जातील, जेणेकरून मतदान केंद्र शोधणं आणि यादीत नाव मिळवणं अधिक सोपं होईल.या सर्व सुधारणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या असून, मार्चमध्ये झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये या बदलांची रूपरेषा ठरवण्यात आली होती. मतदार यादी ही लोकांची यादी असते ज्यांनी विशिष्ट अधिकार क्षेत्रातील विशिष्ट निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. भारतीय निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे, जी मतदार याद्या तयार करते. मतदार यादी ही निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणारी अधिकृत यादी आहे, ज्यात देशातील सर्व पात्र मतदारांची नावे, वयोमर्यादा, लिंग, आणि मतदार ओळख क्रमांक नमूद केलेले असते. ही यादी प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार विभागलेली असते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे