देशात जातनिहाय जनगणना होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

1 min read

नवीदिल्ली दि.३०:- केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. देशभरात जातनिहाय जनगणना केली जावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून मागणी केली जात होती. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अनेकदा हा मुद्दा लावून धरला होता.देशाच्या विकासात कुणाचं किती योगदान आहे ते जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर यावं, अशी भूमिका राहुल गांधी यांनी याआधी अनेकदा मांडली आहे. त्यामुळे त्यांची मागणी आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे. कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर कमिटीची देखील आज बैठक झाली. या बैठकीत स्वत: अश्विनी वैष्णव यांनी त्याबाबत माहिती देताना सांगितलं की, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संसदेत भाषण देताना म्हटलं होतं की, जनगनणा केली जाईल. पण नंतर सोशो इकोनॉमिक सर्वेक्षण केलं गेलं. त्यामध्ये जातीचा विचार केला गेला होता. पण त्याचे आकडे जाहीर झाले नव्हते. काही राज्य सरकारने सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला होता. पण राज्य सरकारने केलेल्या सर्व्हेत पारदर्शकता नव्हती, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. जातीय जनगणना केली पाहिजे, अशी सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे आज कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आणि या बैठकीत जातीय जनगणना होईल, असा निर्णय घेण्यात आला. 2025-26 च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल, असा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी तर देशभरात आपल्या सभांत जातनिहाय जनगणनेला पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला होता. देशाच्या शसकीय विभागात, मंत्रालयांत, तसेच वेगवेगळ्या खात्यांत कोणत्या समाजाचे किती लोक आहेत. कोणत्या समाजाला किती प्रतिनिधीत्व मिळतं हे समजलं पाहिजे. त्यानुसार भविष्यात धोरण आखता येईल, अशी भूमिका राहुल गांधी यांनी वेळोवेळी घेतलेली आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणीही त्यांनी याआधी अनेकदा केलेली आहे. असे असतानाच आता केंद्राने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे