प्रतीक्षा संपली; धाकधूक वाढली; दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी; तारीख अखेर जाहीर
1 min read
पुणे दि.३०- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मिळालेल्या महितीनुसार बारावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाईल आणि दहावीचा निकाल १५ मे किंवा १६ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.बोर्डाने मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि निकालांचे संकलन सुरू आहे. दिलेल्या तारखेला विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहू शकतात, ज्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. यावर्षी ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती,ज्यामध्ये बारावीसाठी १५.२४ लाख आणि दहावीसाठी १६.३९ लाख विद्यार्थी होते.
जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निकाल जाहीर केले जातील,अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान,निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पहिल्यांदाच दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर सुरु झाली होती.
दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च ला झाली, दरम्यान, वेळेत पेपर तपासणी प्रकिया पूर्ण झाल्याने निकाल दिलेल्या वेळेत लागण्याची शक्यता अधिक जास्त आहे. निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून लवकरच केली जाईल.
विद्यार्थ्यांना निकाला बद्दलच्या अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी नियमितपणे बोर्डाची वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.