विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्याचा अविष्कार न राहता, विचारांचे संमेलन बनले:- पांडुरंग साळवे
1 min read
साकोरी दि.२८:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी आणि पी.एम.हायस्कूल, साकोरी येथील विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्याचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले असून हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन संस्थापक पांडुरंग साळवे यांनी आपल्या भाषणात बोलताना केले.या सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयात मातृपुजनाचा कार्यक्रम ही घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मातृपुजनाने झाली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचे माता तसेच पिता पालक उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याला पूजेचे साहित्य सोबत आणायला सांगितले होते. पालक व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ब्रह्मवृंदानी सांगितल्याप्रमाणे करण्यात आली होती.
त्यानंतर ब्रह्मवृंदानी मंत्र म्हणून विद्यार्थी व पालक यांना सूचना केल्या आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मातृपुजन पार पडले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व पालकांना स्नेहभोजन देण्यात आले.यानंतर दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीपुजन, नटराज पूजन व दीपप्रज्वलन झाले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग साळवे, तसेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव), उपप्राचार्य शरद गोरडे, पी. एम.हायस्कूलचे प्राचार्य रमेश शेवाळे, तसेच पालक प्रतिनिधी व स्थानिक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना झाली. त्यानंतर भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.
भरतनाट्यम्, कोळीगीते, कोकरू नृत्य, आदिवासी नृत्य, ऐतिहासिक प्रसंग, सामाजिक व नैतिक मूल्य दर्शविणारे ॲक्ट, देशभक्तीपर गीतांवर नृत्य असे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सोनवणे व प्रियांका शेवाळे यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून हे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन संस्थापक पांडुरंग साळवे यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक आपल्या भाषणातून केले.