पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी काश्मीरमध्येच लपलेत; योग्य वेळी त्यांचा खात्मा होणार:- निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

1 min read

मुंबई दि.३:- पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानला गेले नाहीत, ते काश्मीरातच आहेत. योग्य वेळ येताच त्यांना शोधून काढून भारतीय लष्कर त्यांना ठार करेल असा विश्वास निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केला. आज जर आपली लढाई झाली तर ती शेवटपर्यंत लढण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युद्धाय कृतनिश्चय, म्हणत आज भारताचं लष्कर युद्धसज्ज आहे. अब जंग जरुरी है असं म्हणत सर्वसामान्य लोकही युद्धासाठी मानसिक तयारी दर्शवत आहेत. पण मैदानावर युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असतं ते अचूक मार्गदर्शन, अतुल्य साहस, योग्य व्यूहरचना, शत्रूची खडान् खडा माहिती, दुर्दम्य आत्मविश्वास आणि समयसूचकता. याच जोरावर अनेक लष्करी मोहिमा यशस्वी करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला.भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागातली ही तणावाची परिस्थिती राजेंद्र निंभोरकरांनी जवळून अनुभवली आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारत तोडीस तोड उत्तर देऊ शकतो, हे अधोरेखित करणारा उरीचा सर्जिकल स्ट्राईक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांच्या नेतृत्वात झाला. लेह, कारगिल, काश्मिर, पूंछ, राजौरी, राजस्थान आणि इशान्य भारतासह अनेक ऑपरेशन्समध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. बारामुल्लात त्यांनी 22 दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीसाठी परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.पहलगाम दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, “प्रत्येक देशामध्ये या गोष्टी घडत असतात. इस्त्रायलमध्येही गुप्तचर यंत्रणांना अनेकवेळा अपयश आलं आहे. 2010 पासून आतापर्यंत खूप कमी दहशतवादी कारवाया झाल्या. एखाद्या वेळी अशी घटना घडू शकते. तीनही सैन्याने मिळून काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. पंतप्रधानांनी तीनही सेनांना अधिकार दिले आहेत ही गोष्टही मोठी आहे. त्याचा सकारात्मक परिणाम सेनेवर होऊ शकतो. सैन्यदल अधिक कार्यक्षमतेने काम करु शकतात असं मत राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलं.भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर पाकिस्तानचे लष्कर भारताला प्रत्युत्तर देईल का या प्रश्नावर बोलताना राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, या आधीचा लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ हा मॅड टाईप व्यक्ती होता. त्याच्या मनात जे काही असेल ते तो करणारच. त्याची रिक्स टेकिंग कपॅसिटी 80 टक्के होती. फक्त 20 टक्के विजयाची क्षमता असली तरी तो पुढे जायचा. परवेझ मुशर्रफ हा एक सैनिक होता. पण सध्याचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हा सैनिक नाही तर तो धार्मिक कट्टरवादी आहे. त्याची रिस्क टेकिंग कपॅसिटी ही खूप कमी आहे. त्यामुळे तो भारताला उत्तर देईल याची शक्यता नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे