पाकिस्तानी पत्नीची माहिती दडवल्याने CRPF जवान बडतर्फ

नवी दिल्ली दि.४ – पाकिस्तानी पत्नीविषयीची माहिती दडवणे केंद्रीय राखीव पोलीस दलातील न (सीआरपीएफ) जवानाच्या चांगलेच अंगलट आले. सीआरपीएफने महत्त्वाची अॅक्शन घेत संबंधित न जवानाला सेवेतून बडतर्फ केले. त्यासाठी जवानाची कृती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे कारण देण्यात आले.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. दहशतवादाला सातत्याने प्रोत्साहन देत असल्याबद्दल पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलली. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला.
त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी व्हिसा रद्द करण्यात आले. भारताने कडक भूमिका घेतल्याने पाकिस्तानी नागरिकांना घरवापसी करणे भाग पडले. त्यांची पाकिस्तानला परतण्याची लगबग सुरू असताना आता बडतर्फ झालेला जवान मुनीर अहमद आणि त्याची पत्नी मीनल खान यांची स्टोरी समोर आली.
मीनल पाकिस्तानी नागरिक आहे. ती सोशल मीडियावरून जम्मूत तैनात असणाऱ्या मुनीरच्या संपर्कात आली. प्रेम फुलल्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. त्यानंतर मागील वर्षी मेमध्ये त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ऑनलाइन विवाह केला. अल्पमुदतीचा व्हिसा मंजूर झाल्याने मीनल चालू वर्षी मार्चमध्ये भारतात आली. त्या व्हिसाची मुदत त्याच महिन्यात समाप्त झाली.