दोन वर्षापूर्वी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची मेंढपाळाच्या तावडीतून मुक्तता

1 min read

जुन्नर दि. १८:- मेंढपाळाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीला एकविरा देवीच्या यात्रेतून पळवून आणून मेंढरे राखण्याच्या कामावर ठेवल्याचा प्रकार शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी संतोष बिरा करगळ (वय ४० रा. ढवळपुरी ता. पारनेर, जिल्हा. अहिल्यानगर) असे जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेंढपाळाचे नाव आहे.भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्ञानदेव थोरवे यांच्या घराकडे मेंढपाळां सोबत असलेली लहान मुलगी पाणी नेण्यासाठी आली होती. त्यांनी तिची आस्थेने विचारपूस केली असता ती रडू लागली व तिला पळवून आणल्याचे तिने सांगितले. तद्नंतर ज्ञानदेव थोरवे यांनी गावचे पोलीस पाटील अमोल थोरवे यांना बोलावून त्याबातची माहिती दिली. पोलीस पाटलांनी या मुलीसोबत चर्चा केली असता ती म्हणाली मी मेंढपाळ संतोष याची मुलगी नसून त्याने मला एकवीरा देवीच्या जत्रेतून खाऊ आणि नविन कपड्यांचे अमीष दाखवून पळवून आणले आहे. माझे आई वडील चाकण येथे वास्तव्यास असून ते भंगार गोळा करण्याचे काम करतात.अपहरण झाले त्यावेळी मुलीचे कुटुंब लोणावळा येथील वळवण पुला खाली रहात होते. तेथून ते एकविरा देवीच्या यात्रेसाठी गेले होते. त्यादिवशी तिच्या आई वडिलांनी दारू प्राशासन केल्याने त्यांची शुद्ध हरपली असताना. काही स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून आरोपीने तिला तेथून आणल्याचे मुलीने सांगितले. पोलीस पाटील अमोल थोरवे यांनी घटनेची माहिती जुन्नर पोलिसांना दिली. जुन्नरच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी यांनी मुलीशी स्वतः संवाद साधून तिला विश्वासात घेऊन माहिती प्राप्त करून कारवाई केली.जुन्नरचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, हृषीकेश तिटमे, सागर शिंदे, विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

१४ जून २०२३ रोजी केले होते अपहरण

या मुलीच्या पालकांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार लोणावळा ग्रामीणच्या कार्ले पोलीस ठाण्यात १४ जून २०२३ रोजी दाखल केली असल्याचे समजले. त्यानंतर जुन्नर पोलिसांनी २४ तासांच्या आत कारवाई करून या अल्पवयीन मुलगी व तिचे अपहरण करणार्या आरोपिला ताब्यात घेऊन लोणावळा ग्रामीण येथील कार्ले पोलिसांकडे सुपूर्द केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे