अभिनेत्यांच्या मृत्यूच्या समाजमाध्यमांवर खोट्या बातम्या पसरविणाऱ्या वृत्तीला श्रद्धांजली – आदेश बांदेकर

मुंबई, दि. १८ सध्या समाजमाध्यमांवर कोणतीही शहानिशा न करताच खोडसाळ वृत्तीने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरविण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘आदेश बांदेकर यांच्या हृदयाचे ठोके मंदावले… मृत्यूच्या दारात’ अशी खोटी बातमी व्हायरल करण्यात आली आहे. मात्र, मी सुदृढ असून सुखरूप प्रवास करीत आहे. मराठी कलाकारांबद्दल खोट्या बातम्या पसरविणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो, असे आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे.यासंदर्भात समाजमाध्यमांवर एक चित्रफित अपलोड करीत त्यांनी या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला.
या व्हिडिओमध्ये बांदेकर म्हणतात की, नमस्कार, मी सुदृढ आणि व्यवस्थित असून प्रवास करीत आहे. प्रेमापोटी आणि काळजीपोटी अनेकांचे फोन येत आहेत. जे संपर्क साधू शकत नाहीत, त्यांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपले खूप हितचिंतक असतात.
मात्र, कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरविते आणि ही वृत्ती आहे, या वृत्तीला काही करू शकत नाही. आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले ते निधनापर्यंत बातम्या पसरविल्या असल्याचे बांदेकर म्हणाले.