अखेर लवणवाडीत अपघात प्रवण क्षेत्राचे लागले बोर्ड
1 min read
आळेफाटा दि.८:- दुचाकीला पीकअप टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत पाच जण ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना नगर – कल्याण मार्गावरील लवणवाडी (ता.जुन्नर) येथे मार्च महिन्यात घडली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी येथे रबरी गतिरोधक व अपघात प्रवण क्षेत्र असे बोर्ड लावण्याची मागणी केली होती.
या ठिकाणी वारंवार अपघात होत असून ज्या ठिकाणी अपघात झाला आहे ती जागा लवणात असुन दोन्हीही बाजुने उतार असल्याने या जागेवर वारंवार अपघात झालेले आहेत. तसेच या ठिकाणी शाळा, दुध डेअरी, मंदिर लोकवस्ती असुन नेहमीच गर्दी असते त्यामुळे या जागेवर गतीरोधक टाकावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.
महामार्गावर गतिरोधक बसवणे शक्य नसल्याने येथे अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे बोर्ड लावले आहेत.त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात जास्त होतात तेथे लवकरच बोर्ड लावण्याचे काम सुरू असल्याची माहिती कल्याण – नगर महामार्ग जि.एस ग्रुप चे मॅनेजर सतीश बागल यांनी दिली.
“महामार्गावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या व झुडपे वाढली आहेत.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.फांद्या व झुडपे काढण्यात यावेत.अपघाती जागेवर पांढरे पट्टे मारावेत.”
गौरव कोकणे
ग्रामस्थ, लवणवाडी