चुकून एसटी बसमध्ये चढलेले दोघे चिमुकले चालक वाहकाच्या सतर्कतेने सुखरूप
1 min read
मंचर दि.२८:- दोन अनोळखी महिलांबरोबर एसटी बसमध्ये आलेल्या दोन अल्पवयीन मुलांना बसच्या चालक व वाहकाच्या सतर्कतेमुळे घोडेगाव-मंचर पोलिसांच्या मदतीने त्यांच्या आई-वडिलांपर्यंत सुखरूप पोहोचवले असल्याची घटना बुधवार, दि. २६ रोजी मंचर (ता. आंबेगाव) येथे उघडकीस आली.बुधवार, दि. २६ रोजी एम एच ०७, सी ७३७९ ही एसटी बस पुणे येथून भीमाशंकरकडे जाण्यासाठी दुपारी सव्वा चार वाजता निघाली असता भोसरीमध्ये दोन अनोळखी महिला दोन मुलांना घेऊन बसमध्ये बसल्या होत्या. या बसमध्ये चालक म्हणून संदीप सोनवणे व वाहक समाधान मोरे हे काम पाहत होते.
प्रवासादरम्यान वाहक समाधान मोरे यांनी सदर महिलांचे तिकीट काढते वेळी या मुलांचे तिकीटकाढावे लागेल, असे म्हणाले. यावर महिलांनी मुले लहान आहेत. असे सांगितले. मंचर बस स्थानकावर सायंकाळी एसटी बस आली असता या महिला दोन मुलांना बसमध्ये सोडून खाली उतरल्या होत्या.
पुढे बस लांडेवाडीच्या हद्दीत आली असता एसटी बसचे वाहक समाधान मोरे एसटी प्रवाशांचे तिकीट काढत आले असता त्यांना मागील सीटवर दोन मुले दिसली.तुमचे आई, वडील कोठे आहे असे विचारले असता त्यांनी बरोबर असलेल्या महिला आमच्या ओळखीच्या नाही, असे सांगितले.
त्यावेळी समाधान मोरे यांनी मंचरचे वाहतूक नियंत्रक मोहम्मद सलील सय्यद यांच्या सुचनेनुसार मुलांना घोडेगाव पोलीस ठाणे येथे हजर केले. मुले भोसरीतील असल्याची माहिती मिळाल्यानंतर घोडेगाव पोलिसांनी भोसरी पोलिसांशी संपर्क साधत मुलांचे फोटो
भोसरी पोलिसांना पाठवले. त्यानुसार आयुर आशिष भोसले (वय ७) व दुसरा आदित्य आशिष भोसले (वय ५) अशी मुलांची ओळख पटली. मुलांचे वडील आशिष भोसले यांच्याकडे त्यांना सोपवले.