मंत्री गिरीश महाजनांच्या डोक्याला रॉड लागला; रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात
1 min read
जळगाव दि.२७:- राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला रॉड लागल्याने ते जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगावमधील वरणगाव येथील शहीद अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना हा प्रकार घडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले होते. शहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे मिलिटरीच्या ट्रकमध्ये उंचावर उडी मारून चढले,
मात्र याचवेळी ट्रकवरचा रॉड त्यांच्या डोक्याला लागला. डोक्याला जोरदार मार बसल्याने रक्तस्राव झाला तसेच क्षणभर गिरीश महाजन यांना चक्कर आली. डोक्याला रॉड लागून मोठा रक्तस्त्राव झाल्याने तसेच चक्कर आल्याने गिरीश महाजन यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. यावेळी कार्यकर्ते तसेच डॉक्टरांची चांगलीच धावपळ झाली.
रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर गिरीश महाजन हे तातडीने एका महत्त्वाच्या बैठकीसाठी नाशिकसाठी रवाना झाले. वरणगाव येथील वीरगती प्राप्त झालेले जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज वरणगाव शहरात आले होते.
वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर, डोक्यातून रक्तस्राव होत असतानाही गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.
मात्र, डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह करुन प्राथमिक उपचारासाठी त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले.
त्यानंतर, गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या परिवाराला भेट देत सांत्वन केले. तसेच, काळजी करू नका देशसेवा करीत असतांना अर्जुनला वीरमरण आले याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे अभिवचन महाजन यांनी दिले.