उष्माघाताचा पहिला बळी; घराबाहेर पडताना काळजी घ्या
1 min read
संभाजीनगर दि.२७:- होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात ४९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे सरकल्याने हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते.
या तापमानामुळे सोयगाव तालुक्यात पहिला बळी गेला आहे. निमखेडी बस थांब्यावरील ही घटना घडली. उन्हात बस थांब्यात विसावा घेणार्या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. अमोल दामोदर बावस्कर असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान ३६°C पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत तापमान साधारण ३३°C च्या आसपास आहे. हवामान विभागानुसार, शनिवारपासून तापमान वाढू लागेल आणि ३१ मार्चपर्यंत ३५°C पर्यंत घसरेल. या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. एप्रिल १ ते ६ दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) काही भागांत प्री-मान्सूनच्या हलक्या पावसाची शक्यता आहे.
मंगळवारी IMDच्या कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान ३२.५°C आणि सांताक्रूझ वेधशाळेत ३३.५°C नोंदवले गेले. IMDच्या नोंदीनुसार, मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान २८ मार्च १९५६ रोजी ४१.७°C नोंदवले गेले होते.