जुन्नर तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढला; रस्ते निर्मनुष्य

1 min read

बेल्हे दि.२०:- गेल्या चार पाच दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून जुन्नर तालुक्यात उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे तालुक्यातील बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली असून रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. या वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाणीटंचाई वाढण्याची शक्यता आहे.मार्चच्या पहिल्या दिवसापासूनच सूर्याचा पारा चढू लागला असून दुपारी अकरा वाजल्यानंतर संपूर्ण बेल्हे गावातील रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. त्यातच व्यापारी बांधवांचे मार्च महिन्याचे आर्थिक वर्ष असल्याने सर्वत्र शांतता जाणवत आहे. आठवडाभरापासूनच सूर्य आग ओकत असून जवळपास ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनाही ती आता असह्य होऊ लागली असून, अजून दोन ते अडीच महिने उन्हाळा कसा जाणार याची चिंता नागरिकांना आतापासूनच लागली आहे. मागील उन्हाळ्यात सूर्याचा पारा ४१ अंश पार गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात काय हाल होतील याची चिंता लागली आहे. उन्हाचा कडाका सारखा वाढत असल्याने नागरिक आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारी गावातील सर्वच मुख्य रस्त्यावरील वाहनांची वाहतूक व नागरिकांची वर्दळ कमी होऊ लागली आहे.उष्णतामान वाढीमुळे पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून नदीनाले, तलाव, कूपनलिका, विहिरी यांनी तळ गाठला असून ग्रामीण भागात मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे