भावाच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्याने बहिणीने प्राण सोडले; जळगावमधील ह्रदयद्रावक घटना

1 min read

जळगाव दि.१९:- मायेचा हात पाठीशी असलेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूची वार्ता कानावर पडताच बहिणीला मोठा धक्का बसला. भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे व्याकूळ झालेल्या लहान बहिणीला हा धक्का सहन झाला नाही आणि तिनेही अवघ्या तीन तासातच आपले प्राण सोडले. अतूट प्रेम असलेल्या या बहीण-भावाच्या अंत्ययात्रा वेगवेगळ्या गावात पण एकाच दिवशी काढण्याची वेळ आल्याने अवघ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचेही हृदय हेलावले आहे. जळगाव जिल्ह्यात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

अमळनेर येथील धुळे-नंदुरबार ग. स. सोसायटीचे निवृत्त व्यवस्थापक रमण सखाराम पाटील (वय ५९) पत्नी प्रतिभा यांच्यासह पुणे येथील मुलीकडे गेले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे रविवारी साडेपाच वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मृत्यूची वार्ता जळगाव जिल्ह्यातील नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह अमळनेरला आणण्याची तयारी झाली. पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रमण पाटील यांच्या पाठच्या बहीण ललिता रावसाहेब काटे-पाटील यांना मायेचा हात सतत पाठीशी असलेल्या भावाच्या मृत्यूची वार्ता मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. ही बातमी ऐकून त्यंनाही हृदयविकाराचा तीव्र धक्का आला.त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ अमेळनेरा येथील खासगी रुग्णलयात उपचारासाठी आणले. मात्र, भावाच्या मृत्यूपाठोपाठ अवघ्या तीन तासात साडेआठ वाजता ललिता यांचीही प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. भाऊ-बहिणीच्या नात्यातील या अतूट प्रेमाने उपस्थितांच्याही डोळे पाणावले. या घटनेने दोन्ही गावात एकच शोककळा पसरली. सोमवारी रमण पाटील यांच्यावर सकाळी दहा वाजता अमळनेर शहरातील पैलाड भागात असलेल्या अमरधाममध्ये दहा वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, दुपारी एक वाजताच्या सुमारास पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे ललिता काटे -पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने दोन्ही गावात शोककळी पसरली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे