कोल्हापूरच्या जवानाला मणिपूरमध्ये वीरमरण
1 min read
कोल्हापूर दि.१५:- भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण आलं आहे. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान शहीद झाला आहे.
सुनिल विठ्ठल गुजर (वय-२७) असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. २०१९ साली सुनिल विठ्ठल गुजर भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.सुनिल गुजर यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर ते मणीपूर येथे ११० बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजवत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन सुमारे ८०० फूट खोल दरीमध्ये कोसळले आणि अपघात झाला.
या अपघातामध्ये सुनिल गुजर यांचा मृत्यू झाला. सुनील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण गावातच झाले. २०२३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मी, वडील विठ्ठल, पत्नी स्वप्नाली, सहा महिन्यांचा मुलगा शिवांश, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.
सुनील हे एक कर्तव्यदक्ष जवान होते. देशाच्या रक्षणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या निधनाने देशाने एक शूरवीर जवान गमावला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. शहीद जवान सुनिल गुजर यांचे पार्थिव कोल्हापुरच्या शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर गावी आणण्यात येणार आहे.