सपाचे आमदार अबू आझमींचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; औरंगजेबाची प्रशंसा करणं भोवलं
1 min read
मुंबई दि.५:- विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पहिल्याच दिवशी सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याच्यावर एक विधान केले होते. औरंगजेबाचे कौतुक केले होते. यावरुन विधिमंडळात गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमीयांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. दरम्यान, आज अबू आझमी यांच्याविरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे.
आज विधिमंडळात मंत्री चंद्रकात पाटील यांनी आमदार अबू आझमी यांच्या निलंबानाचा प्रस्ताव मांडला. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा केल्याच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला होता. सत्तापक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत कामकाज वारंवार बंद पाडले. शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, आता आज आझमी यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभेत सभागृहाचे कामकाज तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी, तर विधान परिषदेत दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याचे अनुक्रमे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांनी जाहीर केले. विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे महेश लांडगे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी अबू आझमींवर हल्लाबोल केला. भाजप-शिंदेसेनेचे आमदार वेलमध्ये उतरले
आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी त्यांनी सभागृह दणाणून सोडले. औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर उद्ध्वस्त केली पाहिजे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
उद्धव सेनेचे आमदारही शेवटी आक्रमक झाले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली, त्यांच्यापैकी कोणाला बोलण्याची संधी मिळण्याआधीच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.