शेवग्याच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचा खून

1 min read

मंचर दि.२७:- शेवग्याच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून तसेच जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलांनी भावाला मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना महाळुंगे पडवळ येथे बुधवार, दि. २६ रोजी सकाळी घडली आहे. ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९, रा. महाळुंगे पडवळ) असे खून झालेल्या भावाचे नाव असून याप्रकरणी त्यांचे भाऊ, त्याची बायको व दोन पुतणे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.

मयत चंद्रकांत चासकर यांचा मुलगा किरण चंद्रकांत चासकर यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे. महाळुंगे पडवळ येथील चंद्रकांत चासकर व सुभाष चासकर यांच्या सामायिक शेत जमिनीची वाटणी अद्याप झाली नसल्याने त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत चासकर, पत्नी नंदा चासकर, सून रूपाली चासकर तसेच किरण चासकर हे शेतात शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुभाष चासकर याने शिवीगाळ दमदाटी करत रूपाली यांच्या हातातील शेवग्याच्या शेंगा ओढून घेतल्या. किरण चासकर यांनी विचारणा केली असता पुण्यावरून मुलांना बोलावून घेऊन तुमच्याकडे बघतो, अशी धमकी सुभाष चासकर याने दिली. बुधवारी सकाळी चंद्रकांत चासकर यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ सुभाष सदाशिव चासकर, त्यांची पत्नी मंदा सुभाष चासकर, पुतणे सचिन सुभाष चासकर, नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर हे सर्वजण आले. शिवीगाळ, दमदाटी करून त्यांनी चंद्रकांत चासकर यांना धक्का देऊन खाली जमिनीवर पाडले, त्यानंतर चौघांनीही त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुभाष चासकर हे चंद्रकांत चासकर यांच्या छातीवर बसून त्यांना ठोसे मारत होते. त्यावेळी मंदा चासकर यांनी पाय धरले होते. तर सचिन व नितीन चासकर हे लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते. वडिलांना वाचवण्यासाठी किरण चासकर पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन चंद्रकांत चासकर हे बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यासंदर्भात किरण चासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष चासकर, मंदा चासकर, सचिन चासकर, नितीन उर्फ दत्ता चासकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे