पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या; ९.८ कोटी शेतकऱ्यांना मिळणार २२ हजार कोटी रुपये
1 min read
नवी दिल्ली दि.२३:- पीएम किसान योजनेअंतर्गत १९ वा हप्ता देशातील शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार आहे. या अंतर्गत २२ हजार कोटी रुपये ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार दि.२४ या योजनेअंतर्गत ही रक्कम शेतकऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यात मिळतात.कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी रोजी भागलपूर येथील कार्यक्रमात हा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतील. यामुळे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ३.४६ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. आता नवा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम वाढून ३.६८ लाख कोटी रुपये इतकी होणार आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. शेतकऱ्यांना मदत करणारी ही जगातील सर्वात मोठी योजना असल्याचे समजले जाते. छोट्या शेतकऱ्यांना खते व बियाण्यासाठी मदत मिळावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
सरकारने २०१४ पासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारण्यास मदत मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची प्रश्न आहेत त्या शेतकऱ्याबरोबर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार असतो, असेही मंत्रालयाने सांगितले.