भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज हायव्होल्टेज सामना

1 min read

दुबई दि.२३:- यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आणि क्रिकेटमधील हायव्होल्टेज सामना भारत विरुद्ध पाकिस्तान आज होणार आहे. दुबईच्या रणात आज पारंपरीक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. दोन्ही संघ जवळपास 8 महिन्यानंतर एकमेकांसमोर येणार आहेत. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर विजय मिळवला. तर, दुसरीकडे पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानवर आजच्या सामन्याचा दबाव असणार आहे.उपांत्य फेरीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी भारताला या सामन्यात विजय गरजेचा आहे, तर पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात रोमांच पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, सामन्याच्या पूर्व संध्येला भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने ऋषभ पंत आजारी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पण त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनला धक्का बसणार नाही. तो उपलब्ध नसल्याने केएल राहुलच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीनेही बांगलादेशविरुद्ध ५ विकेट्स घेत दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे तो संघात असेल. पण त्याच्यासोबत हर्षित राणाला कायम करणार की अर्शदीप सिंगला संधी दिली जाणार हे पाहावे लागणार आहे.याव्यतिरिक्त भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. फलंदाजी फळीत रोहित शर्मासह फॉर्ममध्ये असलेला गिलच मैदानात उतरेल. मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल असतील. तसेच रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे अष्टपैलू फलंदाजीत सखोलता देतात. पाकिस्तानला मात्र प्रमुख फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे बाहेर झाल्याने धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागणार आहे. ते इमाम-उल-हकला संधी देऊ शकतात. तरी संघाची फलंदाजीची भिस्त बाबर आझम, कर्णधार मोहम्मद रिझवान यांच्यावर असणार आहे. त्यांना अन्य फलंदाजांकडूनही योगदानाची अपेक्षा असेल.गोलंदाजी फळीत पाकिस्तान तीन वेगवान गोलंदाजांसहच उतरण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे