पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण मार्गेच व्हावी!:- छगन भुजबळ

1 min read

नाशिक दि.१९:- इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचा समावेश करून राज्य शासनाने प्रकल्पाचा ५०% वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी अंतिम आखणी सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण यामार्गेच होण्यास पूर्वशर्त करण्यात यावे. अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाने ५०% आर्थिक सहभाग देण्याचे धोरण स्वीकारले आहे. पुणे-नाशिक या २३६ कि.मी. लांबीच्या नवीन सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ची नियुक्ती करून आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली होती.मात्र प्रस्तावित संरेखन नारायणगावमधून जात होते जिथे राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्र (एनसीआरए), पुणे यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळा स्थापित केली आहे. या वेधशाळेच्या कार्यक्षेत्रातून प्रस्तावित रेल्वेमार्ग जात असल्याने मा. रेल्वे मंत्री यांनी दि. १८.१२.२०२४ रोजी सदर रेल्वेमार्गाचे संरेखन बदलून पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक असा ८० कि.मी. वाळसा घालून करण्यात आला. तसेच हा रेल्वे प्रकल्प महारेलऐवजी मध्य रेल्वेमार्फत करण्याचे जाहीर केले. सदर संरेखन कुठल्याही परिस्थितीत पुणे-नाशिक थेट रेल्वेमार्गास अनुसरून नाही, ज्याचा सर्वाधिक फटका पुणे-नाशिक औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतुकीसोबत प्रवासी वाहतुकीला देखील बसणार आहे.केंद्र सरकारने इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत नाशिक वाढवण पोर्ट रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे (FLS) नुकताच मंजूर केला आहे. पुणे-नाशिक थेट रेल्वेमार्ग पश्चिम महाराष्ट्रातील कंटेनर मालवाहतूक मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला बायपास करून थेट नाशिक मार्गे वाढवण बंदराला जोडेल, ज्यामुळे राज्याला शाश्वत पर्याय उपलब्ध असेल.त्यामुळे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचा समावेश करून राज्य शासनाने ५०% वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी अंतिम आखणी (Alignment) सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गेच होण्यास पूर्व शर्त करण्यात यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे