जुन्नरला शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन:- आमदार शरद सोनवणे

1 min read

जुन्नर दि.१८:- शिवजयंती उत्सवानिमित्ताने यावर्षीचे शिवनेरी भूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये चार व्यक्तींना शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर बुधवारी (दि. १९) प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती जुन्नर शिवनेरीचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.यामध्ये जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब सावळेरामबुवा दांगट यांच्या काळामध्ये विशेष उल्लेखनीय व तालुक्याच्या उत्कर्षासाठी योगदान दिल्याबाबत, डॉ. अमोल अविनाश डुंबरे यांना टाटा कॅन्सर हॉस्पिटल व रुबी हॉस्पिटल पुणे तसेच आळेफाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे कॅन्सर सर्जन म्हणून भरीव योगदान, जालिंदर शिवराम कोरडे यांना पर्यावरण वाढीसाठी वृक्ष लागवड व वृक्ष जोपासणेकामी आजपर्यंत ८००० वृक्षांचे संगोपन, राजाभाऊ दशरथ पायमोडे यांना पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातून पुणे शहरामध्ये पाठवलेल्या सर्व रुग्णांना उपचारादरम्यान अर्थिक मदत निराधारांना मोफत जेवण,औषधासाठी मदतीचा हात देऊन अनेकांचे प्राण वाचवून निःशुल्क सेवा केल्याबद्दल यांचा शिवनेरी भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.शिवजयंती निमित्ताने महिला बचत गटांचे वस्तू व खाद्यपदार्थाचे स्टॉल तीन दिवस राहणार असून कबड्डी स्पर्धा, दोन दिवस बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले आहे. तसेच ऐतिहासिक महानाट्य सादर होणार आहे. दि. १८ रोजी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून शिवनेरी केसरी व चांदीची गदा या किताबाने विजयी मल्लांना सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा मराठमोळा कार्यक्रम संपन्न होणार असून रात्री बारा वाजता छत्रपती श्री शिवाजी स्मारक, पाच रस्ता चौक येथे महाआरती होऊन. सर्वांत मोठा फायर शो आयोजित करण्यात आला आहे. दि. १९ सकाळी शिवनेरी गडावरील शिवाईदेवीस अभिषेक व महापूजा आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. शिवनेरीवर मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवजन्म पाळणा सोहळा शासकीय मानवंदना व शिवभक्तांना संबोधन होणार आहे. दुपारी मर्दानी आणि साहसी खेळ स्पर्धा जुन्नर मधील बुट्टे पाटील विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर सायंकाळी शिवरायांची महाआरती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी जुन्नर शहरामध्ये भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेचा प्रारंभहोणार आहे. रात्री आठ वाजता गायिका वैशाली सामंत व इतर प्रसिद्ध गायकांचा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार शरद सोनवणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे