विषारी घोणस सापाने दंश केलेल्या तरुणाला वाचवण्यात डॉ.सदानंद राऊत यांना यश

1 min read

आणे दि.१५:- आणे (ता.जुन्नर) येथील संभेराव वस्तीवर राहणारा सुरज राजेंद्र संभेराव हा वीस वर्षीय तरुण राहत्या घराच्या मागे ( वार मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. दरम्यान पाणी भरत असताना सकाळी नऊ वाजता अचानक सुरजला आपल्या उजव्या पायाला काहीतरी चावल्याचे जाणवल्यामुळे त्याने मागे वळून बघितले असता त्याला विषारी जातीचा घोणस सर्प दिसून आला. सूरज लहान असला तरी तो घाबरून न जाता प्रसंगावस्थान राखत त्याने प्रथम घरी आपल्या वडिलांना फोन करून सर्पदंश झाल्याची कल्पना दिली पण वडील दूध वितरण करण्यासाठी आणे गावात गेले असल्यामुळे सुरजने प्रथमोपचार म्हणून आपल्या खिशातील रुमाल काढून पायाला घट्ट बांधला व घरी गेला.

सर्पदंश होऊन विष शरीरात पसरल्यामुळे घरी पोहोचताच सुरजला चक्कर येऊ लागली व तो बेशुद्ध झाला.सुरजला त्याचे वडील राजेंद्र संभेराव, बहीण दुर्गा संभेराव, ऋतुजा संभेराव शेजारी ज्ञानेश्वर संभेराव, विजय संभेराव, बाबाजी संभेराव, देवराम संभेराव यांनी वेळ वाया न घालवता ताबडतोब त्याला नारायणगाव येथील डॉक्टर सदानंद राऊत यांच्या विघ्नहर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. राऊत यांनी न दवडता ताबडतोब सुरजच्या रक्ताची चाचणी करून उपचार सुरु केले. अखेर डॉ. राऊत यांच्या उपचाराच्या अथक प्रयत्नांना तिसऱ्या दिवशी यश आले आणि सुरज शुद्धीवर येऊन त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.सुरजवर तब्बल तेरा दिवस राऊत सरांनी उपचार केले आणि त्याला पूर्णपणे बरे केल्यावर घरी सोडण्यात आले. सुरजला घोणस सारख्या अतिविषारी सर्पदंशापासून वाचवल्यामुळे आणे येथील गावकऱ्यांनी डॉ सदानंद राऊत यांचे आभार मानले. सर्पदंश, बिबट हल्ला किंवा काही नैसर्गिक संकट ओढावल्यास शासनाने आर्थिक मदत करावी तसेच शेतीसाठी रात्री विजपुरवठा नाही करता दिवसा विजपुरवठा करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. सर्पदंश झाल्यावर घाबरून न जाता सर्वप्रथम जखमेच्या वरच्या बाजूस कापडाने घट्ट बांधून घ्यावे जेणेकरून विष शरीरात जास्त प्रमाणात पसरणार नाही आणि शक्य होईल तेवढ्या लवकर रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे. घरच्या घरी घरगुती इलाज करत बसू नये. आता कितीही विषारी सर्प असला तरी वेळेत रुग्णास औषधोपचार मिळाला आणि रुग्णाने घाबरून न जाता आपली मानसिकता कमी होऊ दिली नाही तर शंभर टक्के रुग्ण बरे होतात असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच शेतात काम करत असताना लोकांनी पाय गुडघ्यापर्यंत झाकले जातील अशा प्रकारचे गम बूट घालून जावे आणि काळजी घ्यावी असा सल्ला दिला.डॉक्टर राऊत यांच्या उपचारामुळे आजपर्यंत पुणे जिल्हा तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या हजारो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे