महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग; प्रवाशांध्ये भीतीचे वातावरण; जीव वाचवण्यासाठी धावपळ
1 min read
कोल्हापूर दि.१४:- कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री कोल्हापूर ते रुकडीदरम्यान अचानक महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग लागल्याने प्रवासी घाबरले. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ उडाली. प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना पाचारण करून आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. आग विझल्यानंतर रात्री साडेदहा नंतर गाडी पुढे नेण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी कोल्हापूरातून रात्री ८.३५ च्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघते. यामध्ये अनेक आमदार , खासदार , सेलिब्रिटी यांचा समवेश असतो.
आज तर चक्क १५०० हून अधिक प्रवाशी ट्रेनमध्ये होते. ट्रेन नेहमीप्रमाणे आपल्या वेळेमध्ये कोल्हापूरवरून निघाल्यानंतर रुकडीच्या जवळ पोहचताच अचानक सर्वच डब्यांमध्ये जळाल्याचा वास येऊ लागला. अनेक प्रवाशांना आग लागल्याची शंका येऊ लागली. अगदी काही वेळात एसी ट्रेनच्या डब्याला आग लागली.
ही माहिती रेल्वे पोलिस सुधीर गिर्हे यांना कळाली. त्यांनी चेन ओढून तात्काळ ट्रेन थांबवली. रेल्वे पोलिसांनी खाली उतरून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सर्वांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही ट्रेन रात्री साडेदहानंतर मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली. दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.