कुर्ला-पिंपळगाव रोठा चालत्या एसटी बसचा गिअर बॉक्स तुटला; सुदैवाने ५० प्रवासी बचावले

मंचर, दि.९ – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कुर्ला नेहरूनगर ते पिंपळगाव रोठा ही एसटी बस चालू असताना गिअर बॉक्सचे तुकडे होऊन रस्त्यावर पडले. यावेळी एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले; परंतु चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतल्याने बसमधील ५० प्रवासी सुदैवाने वाचले. ही घटना एकलहरे (ता.आंबेगाव) शनिवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता घडली.
कुर्ला नेहरूनगर येथून पिंपळगाव रोठाकडे जाणारी एसटी बस (एमएच ११ बीएल ९४६५) ही मंचर गावाच्या पुढे सकाळी ११ च्या सुमारास एकलहरे (ता. आंबेगाव) येथील पांजरपोळ येथे आली असताना अचानक गाडीच्या इंजिनचा मोठा आवाज
झाला, त्यामुळे एसटी चालक, वाहक तसेच एसटीमधील प्रवासी घाबरले. यावेळी चालक एम. एस. खतिब यांनी प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळवले आणि गाडी थांबवली. त्यानंतर खाली उतरून चालकाने बसविण्यात आले. नादुरुस्त एसटी गाड़ी गाडीची पाहणी केली असता, गिअर बॉक्सचे तुकडे होऊन रस्त्यावर पडल्याचे दिसले.
यामध्ये असलेले ऑइल रस्त्याच्या मधोमध सांडलेले होते. येथून जाणाऱ्या वाटसरूंनी एसटीचा झालेला आवाज ऐकून मंचर पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे पोलीस गणेश येळवंडे, सोमनाथ गवारी, मंगेश काळडोके यांना माहिती कळवली.
पोलीस पथक आणि कळंब येथील रोहित दादा पवार फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष मयूर भालेराव, आयुब शेख, शाहरुख शेख आणि स्थानिकांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे इतर गाड्यांचा अपघात होऊ नये यासाठी त्यावर माती टाकून ऑइल पुसून टाकले.
बसमधील प्रवाशांना इतर एसटी गाडीत नारायणगाव एसटी आगारात दुरुस्तीसाठी नेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
“महामंडळाच्या अनेक बस या कालबाह्य होऊन त्यांची अवस्था अत्यंत जीर्ण झालेली आहे. अनेक एसटी महामंडळाच्या आगारातून बस प्रवासाकरिता निघण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाते; परंतु प्रवासाला निघाल्यानंतर बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे, याला जबाबदार कोण, असा प्रश्न समोर येत आहे.
– वसंतराव बाणखेले,
सेवानिवृत्त एसटी चालक, मंचर