संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर; म्हणाली, पप्पा, तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा
1 min read
जालना दि.११:- संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात मनोज जरांगे-पाटील हेसुद्धा सहभागी झाले होते. या मोर्चात बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आलं. पप्पा, तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा असं वैभवी म्हणाली. तिचे हे शब्द निघताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.वैभवी देशमुख म्हणाली की, आज आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला आहे.
मात्र इथे जमलेल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही उभे राहू शकलो, तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकत आहोत.आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा.
मराठा समाजाला उद्देशून वैभवी म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. आम्ही ज्या वेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या. त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
माझ्या वडिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. माझा एक आरोपींना प्रश्न आहे की, तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारलं? त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील? मला याचं उत्तर हवं आहे. असं वैभवी म्हणाली आणि त्यानंतर तिचा कंठ दाटून आला.
वैभवी पुढे म्हणाली, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मी देशमुख कुटुंबातील मुलगी आहे. माझ्या आई वडिलांची मी लेक आहे. पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, हे म्हणताना वैभवीचा हुंदका सगळ्यांनाच अस्वस्थ करुन गेला.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही यावेळी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की, जगात सगळं दिसत पण माझा भाऊ मला दिसत नाही. माझ्या भावाचं काय चुकलं, 20 वर्ष सेवा केली हे चुकलं का? या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा करा.
सीआयडीच्या हाती एक व्हाईस सॅम्पल लागले आहे, ते मॅच झाले आहे. आमच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ द्या. आपल्या भावाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. गुन्हेगारी मुळासकट उखडून टाकण्याची ही मुख्यमंत्र्यांना संधी आहे.