शाळेत घुसला रेडा; १३ विद्यार्थी जखमी

1 min read

छत्रपती संभाजीनगर दि.३ :- शहरातील एका शाळेत रेडा घुसल्याची घटना समोर आली आहे. रेड्याने केलेल्या हल्ल्यात शाळेतील १३ मुले जखमी झाली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी मुलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा रेडा कुठून आणि कसा आला, याबाबत माहिती समजू शकली नाही.प्राथमिक माहितीनुसार, शहरातील टाऊन हॉल येथे मॉडेल इंग्रजी शाळेत बुधवारी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होते. परंतु, सकाळी साडेदहाच्या सुमारास एक रेडा अचानक शाळेत घुसला. या रेड्याने शाळेत धुडगूस घालायला सुरुवात केल्यानंतर एकच धावपळ झाली. रेड्याच्या हल्ल्यात १३ मुले जखमी झाली. आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रेड्याच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा पाय मोडला आहे. दरम्यान, या घटनेवरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका स्कूलबसला आग लागली होती. या बसमध्ये चौथी ते सातवी वर्गात शिकणारे ३५ विद्यार्थी होते. दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे