शिरुर लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी वाढली:- खासदार डॉ.अमोल कोल्हे

1 min read

जुन्नर दि.३१:- महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात अवैध धंदे व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. औद्योगिक परिसरातील दहशत, सर्वत्र असलेला ड्रग्जचा सुळसुळाट, दारू व जुगाराचे अड्डे, बेकायदेशीर लॉज, मटक्याचे जुगाराचे अड्डे अशा अनेक अवैध गोष्टींमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील गुन्हेगारीने अक्षरशः कळस गाठला आहे, अशा अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी, ड्रग्स व्यापार रोखण्यासाठी लवकरात लवकर कठोर पावले उचलावावीत, अशी मागणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पोलीस विभागाकडे केली आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या पुणे जिल्हा ग्रामीण पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागातील औद्योगिक परिसरातील दहशत, सर्वत्र असलेला ड्रग्जचा सुळसुळाट, दारू व जुगाराचे अड्डे, बेकायदेशीर लॉज, मटक्याचे जुगाराचे अड्डे अशा अनेक अवैध गोष्टींमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील गुन्हेगारीने अक्षरशः कळस गाठला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अलिकडे अवैध धंदे व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः औद्योगिक परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी व ठेकेदारासाठी चाललेली चढाओढ गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे. तरुण वर्ग ड्रग्सच्या आहारी जात असल्यामुळे सर्वत्र ड्रग्सचा सुळसुळाट झाला आहे. ज्यामुळे तरुणाईचे अगणित नुकसान होत आहे. दारू व जुगाराचे अड्डे, बेकायदेशीर लॉज हे गुन्हेगारीचे केंद्रस्थान होत आहे. अवैध दारू विक्री, मटका, पत्त्यांचे क्लब, जुगार, बेकायदेशीर लॉज व्यवसाय, अवैध खासगी सावकारी यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. परिणामी खून, मारामाऱ्या, अवैध वसुली या गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ कडक पाऊले उचलली नाही तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ही परिस्थिती तातडीने आटोक्यात आणण्यासाठी पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना यापूर्वीच पत्र लिहून विनंती केली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त जीवन देण्यासाठी, माता भगिनींच्या, लेकीच्या सुरक्षेसाठी पोलिस महासंचालकांनी यंत्रणेला योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे