समर्थ संकुलामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ४११ प्रकल्प; विज्ञान हे प्रवाही आणि सुसंवादी असायला हवे: खासदार अमोल कोल्हे
1 min read
बेल्हे दि.२६:- पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०२४-२५ चे उदघाटन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की, प्रयोग कसा करायचा हे प्रत्येकाला कळतं पण आपण हे का करत आहोत याचं उत्तर शोधलं तर आपल्या आयुष्याला एक उद्दिष्ट मिळेल. जेव्हा आपण हे का करतो याचा शोध लावायचा प्रयत्न करतो.
तेव्हा त्याचे उत्तर शोधायला सुरुवात होते आणि तेव्हाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज आधी मनात रुजले जाते. त्याला खतपाणी घालायचं काम या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते असे प्रतिपादन यावेळी खासदार कोल्हे यांनी केले.खासदार कोल्हे पुढे म्हणाले की, येत्या शिवजयंतीचा जो महोत्सव होणार आहे.
त्या ठिकाणी देखील विज्ञानाचे एक दालन असावं. सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित असणारे विज्ञान हे काय असू शकते याचा सर्वांना प्रत्यय त्यामुळे येईल. विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर आणि सोपं करण्यासाठी होतो.विज्ञान हे प्रवाही आणि सुसंवादी असायला हवे.
या ठिकाणी आयडिया बॉक्स मध्ये आयडिया टाकणे सोपे आहे पण आयडिया टाकण्यासाठी बॉक्सरुपी संधी देणे फार महत्वाचे आहे. विज्ञान प्रदर्शन हे नावीन्यपूर्ण कल्पनासाठी चे एक खुले व्यासपीठ आहे.जी एम आर टी जुन्नर तालुक्यात असावी याबाबत कोणाचेही दुमत नाही, त्याबरोबर शेती विकास प्रक्रिया व स्थानिक शेतकरी हिताला तसेच तालुक्याच्या विकासाला प्राधान्य मिळावे.
आत्ताच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इंजीनियरिंग व मेडिकलचा अभ्यासक्रम आपल्या मातृभाषेतून शिकविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कुठलेही शास्त्र असो, विज्ञान असो वा अध्यात्म, सर्वसामान्य अशा भाषेत जर आलं तर प्रत्येकाचं जगणं सुखकर आणि सुंदर होईल असे यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
यावेळी प्रदर्शनामध्ये नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई मार्फत फिरते विज्ञान प्रदर्शन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभाग विद्यमाने मोबाईल सायन्स लॅब, आयुकामार्फत-अवकाश दर्शन व विज्ञान खेळणी मांडणी, दुर्मिळ शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शन यांच्या आयोजन करण्यात आले होते.
प्रकल्प स्पर्धेबरोबरच संगणकीय सादरीकरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, कौन बनेगा विज्ञानपती, पोस्टर सादरीकरण स्पर्धा, चला प्रयोग करूया, आयडिया बॉक्स कॉम्पिटिशन या स्पर्धाचे आयोजन केले आहे.नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, वक्ते यांची व्याख्याने, गणिती व विज्ञान खेळण्याचे स्वतंत्र दालन,
अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग, विद्यार्थी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आदी उपक्रमाचा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी वेगवेगळ्या विज्ञानपूरक उपक्रमांचा या प्रदर्शनात समावेश केला जाणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कालवा सल्लागार समिती चे सदस्य अशोक घोडके, उपतालुकाप्रमुख मोहन शेठ बांगर, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे,
राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, बांगरवाडी चे उपसरपंच मंगेश बांगर, बाबाजी शिंदे, रोहिदास शिंदे, पांडुरंग गगे, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण ताजने, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, सचिव प्रकाश जोंधळे, प्रा.रतिलाल बाबेल, प्रा.तानाजी वामन, रामभाऊ सातपुते, कार्यकारिणी सदस्य,
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे, सचिव अशोक काकडे, यज्ञेश औटी, आशिष हांडे, अतुल आहेर, प्रदीप आहेर, सखाराम शिंदे, निलेश हाडवळे, मच्छिंद्र हाडवळे, गणेश हाडवळे तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख, विज्ञान व गणित शिक्षक आणि शिक्षकेतर
कर्मचारी आणि शाळा व महाविद्यालयातून आलेले विज्ञान प्रमुख शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले.