राहुल गांधी यांनी परभणीत जाऊन मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
1 min read
परभणी दि.२३:- काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज सोमवारी दुपारी परभणीत दाखल होत मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खा. राहुल गांधी यांच्याकडे केली.परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर शहर व जिल्ह्यात मोठ्या आंदोलन झाले. या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये मयत सोमनाथ सूर्यवंशी हा देखील होता.
सोमनाथला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणी शहरात दाखल झाले. त्यानंतर २.३० वाजेच्या सुमारास त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथल्ला, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, प्रज्ञा सातव, संजय जाधव, नितीन राऊत, अमित देशमुख आदींचे उपस्थिती होती.दरम्यान, आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.तसेच सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली,असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी वाहनांच्या प्रचंड ताफ्यासह आज परभणीमध्ये दाखल झाले, त्यांनी निळा शर्ट परिधान केला होता. त्यांनी आज परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाचं सांत्वन राहुल गांधी यांनी केलं. यावेळी सूर्यवंशी कुटुंब चांगलंच भावुक झालं.
आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.दरम्यान या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुला गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली, त्यांची हत्या झाली. मी सूर्यवंशी कुटुंबाला भेटलो. त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले.
99 टक्के नाही तर 100 टक्के पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली. या तरुणाला केवळ यासाठी मारलं की तो एक दलित तरुण आहे, आणि तो संविधानाचं रक्षण करत होता. असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. ज्या लोकांनी हे केलं आहे, त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. मी यावर समाधानी नाही, या लोकांना मारण्यात आलं, हत्या केली. हे राजकारण नाही, तर न्यायाची गोष्ट आहे. लवकरात लवकर कारवाई करावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.