आंबेगावात जादूटोणा, भानामतीचा प्रकार; दोघांवर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल

1 min read

मंचर दि.२९:- कळंब (ता. आंबेगाव) येथील दगडी मळा परिसरात शेतीच्या वादातून एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकेच्या चुलत सासू-सासऱ्यांनी त्यांच्या पतीच्या वडिलोपार्जित शेतात टाचण्या टोचलेले लिंबू, काळया बाहुल्या, नारळ आणि त्यावर बुक्का टाकून भानामती सारखा प्रकार करून. याच बांधकाम व्यावसायिकांच्या शेतातील घरची देखभाल करणाऱ्या इसमाला जीवे मारण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असून; या प्रकारामुळे आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रिया बिपीन भालेराव आणि बिपीन वामन भालेराव (दोघेही रा. तळेगाव दाभाडे, सध्या रा. कळंब) यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळंब येथील दगडी मळ्यात रसिका भालेराव यांच्या पतीची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या शेतजमिनीला त्यांनी तारेचे कुंपण केलेले आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने; एका ठिकाणी शेतजमीन खचल्याने तारेचे कुंपण उघडे पडून; या जागेवरून आत मध्ये प्रवेश करण्याएव्हढी फट निर्माण झाली होती. याच फटीतून रसिका यांचे सासरे बिपीन वामन भालेराव आणि प्रिया बिपीन भालेराव यांनी शेतात प्रवेश करून रसिका भालेराव यांच्या शेतात टाचण्या टोचलेल्या काळया बाहुल्या, टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, त्यावर काळा बुक्का वगैरे साहित्य टाकून करणी, भानामती आणि जादूटोणा केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.हा सर्व प्रकार झाला तेव्हा रसिका भालेराव या बाणेर येथे होत्या; यानंतर त्या त्यांच्या कुटुंबासह गावी आल्या असता; त्यांनी शेतात पाहणी केली. यावेळी त्यांना विविध ठिकाणी काळ्या रंगाच्या कपड्यांनी बनवलेल्या चार बाहुल्या, प्रत्येकावर टोचलेल्या टाचण्या, चार लिंबांमध्ये टोचलेल्या टाचण्या आणि काळ्या अंगाऱ्याने (बुक्क्याने) भरलेला एक नारळ असे जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. या सर्व प्रकारामुळे रसिका भालेराव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. रसिका भालेराव यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने प्रिया आणि बिपीन भालेराव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून; या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे