पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयात वडापाव; उडाण यात्री कॅफेच्या सेवेला प्रारंभ
1 min read
पुणे दि.२९:- पुणे विमानतळावरही ‘उडाण यात्री कॅफे’च्या सेवेला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद प्रमाणेच पुणे विमानतळावरही ही सेवा सुरू झाल्याने खाद्यपदार्थ स्वस्तात मिळणार आहेत. त्यानुसार २० रुपयांमध्ये काॅफी, सामोसा, मिठाई, तर दहा रुपयांमध्ये चहा, पाणी बाॅटल प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. लवकरच ही योजना मुंबई विमानतळावरही सुरू करण्यात येणार आहे.उडाण योजनेच्या माध्यमातून छोटी आणि मोठी शहरे एकमेकांशी जोडली जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून दीड कोटी नागरिकांनी गेल्या दोन ते अडीच वर्षात प्रवास केला आहे.
पुढील दहा वर्षे ही योजना कायम ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. मात्र विमानतळावर खाद्यपदार्थांची विक्री चढ्या दराने होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. त्यामुळे उडाण योजनेप्रमाणे उडाण यात्री कॅफे सुरू करण्याचे नियोजित करण्यात आले होते.
त्यानुसार पुणे विमानतळावर या सेवेला प्रारंभ झाल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांना विमानतळावर स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार कोलकत्ता येथे ही सेवा प्रथम सुरू करण्यात आली.
विमान प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय मंत्रालयाचाहा एक दूरदर्शी उपक्रम आहे. कमी किंमतीमध्ये अल्पोपहार मिळणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
भारतीय विमान प्राधिकरणाने पुणे विमानतळाच्या टर्मिनल इमारतीमध्ये या कॅफेची सुरूवात केली आहे. कॅफेमध्ये अल्पदरामध्ये अनेक खाद्यपदार्थ आणि पेय उपलब्ध आहेत. त्यामध्ये चहा, काॅफी, बाटलीबंद पाणी, वडापाव, समोसा आणि मिठाईचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे. हे कॅफे महिलांकडून चालविले जाणार आहे. गुणवत्ता, स्वच्छतेचे निकषांचे पालन केले जाणार आहे.