पुण्यात २८ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त
1 min read
पुणे दि.२९:- पुणे शहर परिसरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २८ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. बनावट निर्मिती, तसेच वितरण करणाऱ्या या टोळीत आणखी काही जण सामील झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय ३५, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय ३४, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर ( वय ३५, रा. गहुंजे),
नरेश भीमाप्पा शेट्टी ( वय ४२,रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी ( वय ३८, रा. चिंचवड) अशी अटक करण्यातअ आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालायने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.
बनावट नोट प्रकरणात शिवाजीनगर भागातील एका बँकेतील अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. या बँकेच्या शिवाजीनगर शाखेत १७ एप्रिल रोजी २०० र्रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्या असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. बँकेतील अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाेळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक अजित बडे, नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रवीण दडस, ऋचिका जमदाडे, स्वालेहा शेख यांनी तपास करुन आरोपींना पकडले.
आरोपींचा माग कसा लागला?बँकेत ज्या खात्यात बनावट नोटांचा भरणा करण्यात आला होता. संबंधित खातेधारकाने या नोटा खऱ्या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिल्या असल्याचे चौकशीत उघडकीस आले.
त्यानंतर, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे व्यवहार करते. तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या बनावट शंभर नोटा जप्त केल्या. चौकशीत आरोपी भारती गावंड हिचे नाव उघडकीस आले. तिच्याकडून दोनशे रुपयांच्या तीनशे नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सचिन यमगर याला ताब्यात घेण्यात आले. या तिघांनी कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून या बनावट नोटा मिळवल्याचे उघडकीस आले. प्रत्यक्षात शेट्टी कोल्हे नावाने वावरत असल्याचे उघडकीस आले.लोहगावमध्ये छापा आरोपी नरेश शेट्टी हा लोहगाव परिसरात राहायला आहे.
पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरी चार लाख रुपयांच्या एका बाजूने छपाई केलेल्या चार लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याच्या घरातून प्रिंटर,
शाई, नोटा छपाईचे कागद जप्त करण्यात आले, तसेच दोन लाख रुपये जप्त करण्यात आले. या टोळीत गुगलजेड्डी सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याल अटक करण्यात आली.
एक लाख रुपयांत दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त या टोळीने बनावट नोटांंची विक्री अन्य कोणाला केली का ? यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याने बनावट नोटांसाठी कागद, शाई, तसेच नोटा छपाईचे तंत्र कसे मिळवले, याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
आरोपी शेट्टीने आणि साथीदार एक लाख रुपये घेऊन त्याबदल्यात दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीने बनावट नाेटा कोणाल्या दिल्या ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.