बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी
1 min read
ओतूर दि.२२:- येथून बाबीत मळा येथे दुचाकीवरून घरी जात असताना, बिबट्याने झडप मारून, हल्ला केल्याने दुचाकी वरील पती-पत्नी जखमी झाले आहे. सदरची घटना शुक्रवारी दि.२० रोजी ओतूर (ता. जुन्नर) येथील बाबीत मळा रोड पिंपळगाव जोगा कॅनॉलवर घडली.संतोष बन्सीधर गिते वय ४६ वर्ष, योगिता संतोष गीते वय ३९ वर्ष दोघेही (रा. ओतूर) बाबीतमळा असे बिबट्याच्या हल्ल्यात वधपरिक्षेत्राधिकारी जखमी झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
याबाबत ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळे हे अधिक माहिती देताना म्हणाले की, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संतोष गीते हे पत्नी योगिता बरोबर दुचाकीवरून ओतूर येथून, बाबीत मळा येथे घरी जात असताना, सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास,
पिंपळगाव जोगा कॅनॉलवर बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारून दोघा पती-पत्नींना जखमी केले. सदर घटनेची माहिती ओतूर वनविभागाला मिळताच, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वररक्षक विश्वनाथ बेले हे घटनास्थळी जाऊन,
संतोष गीते आणि योगिता गीते यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते, डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांना पुढिल उपचार लस घेण्यासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगीतले.
या हल्ल्यात संतोष गीते यांच्या उजव्या मांडीला तसेच योगिता गीते यांच्या उजव्या हातावर बिबट्याने पंजा मारून जखमी केले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.