एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदासाठी कसे तयार झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
1 min read
मुंबई दि.७:- महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाल्यानंतरही सरकारचा शपथविधी होण्यासाठी तब्बल १२ दिवस लागले. सुरुवातीला शिवसेनेचे (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते, असे चित्र दिसत होते. त्यानंतर गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली. त्यातच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी साताऱ्यातील दरे गावात गेले आणि नंतर ते आजारी पडल्यामुळे शपथविधीचे घोडे अडले.
मग भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी परस्पर ५ डिसेंबरचा शपथविधीचा मुहूर्त एक्स वर पोस्ट केल्यामुळे महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली. अखेर शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार झाले. एकनाथ शिंदे हे यासाठी कसे तयार झाले, याची आतली गोष्ट आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे.मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीमध्ये त्यांनी निकाल लागल्यानंतर १२ दिवसांत काय काय घडले? महायुतीला इतका प्रचंड विजय कसा मिळाला? अशा अनेक विषयांवर सडेतोड भूमिका व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकालानंतर महायुतीच्या पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा.
यासाठी समर्थन दिले होते. मात्र त्यानंतर शिंदेंनी सरकारमध्ये न जाता समन्वय समितीचे प्रमुख पद घ्यावे आणि महायुतीचा कारभार व्यवस्थित हाकण्यावर देखरेख करावी, असा सल्ला काही शिवसेनेच्या नेत्यांनी दिला.
शिवसेनेच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आपल्याचा पक्षाचा व्हावा, असे वाटत होते. माझे आणि एकनाथ शिंदेंचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला होता, असे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
२०१९ सालीही भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले होते. तरीही २०२२ साली एकनाथ शिंदेंना मुख्यंमत्री पद का दिले होते? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, त्यावेळी शिंदेंनी उठाव करत मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
मला वाटते त्यावेळी शिंदेंनी मोठी जोखीम उचलली होती. कारण असे निर्णय कधी कधी तुमचे राजकारण संपवू शकतात. त्यामुळेच मीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव देऊन शिंदेंना मुख्यमंत्री करावे. कारण शिंदेंना मुख्यमंत्री केले तर त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना आत्मविश्वास मिळेल.
त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सर्व काही सांगता आले नाही. पण यावेळी भाजपाचे संख्याबळ प्रचंड असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद देता आले नाही. कारण असा निर्णय घेतला असता तर देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये एक चुकीचा संदेश गेला असता.